Ad will apear here
Next
... आणि असा साकार झाला ‘अशी ही बनवाबनवी’चा ‘टर्निंग पॉइंट’


‘अशी ही बनवाबनवी’
हा चित्रपट २३ सप्टेंबर १९८८ रोजी प्रदर्शित झाला होता. म्हणजेच त्याला आता ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही त्या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. बहुतेक जणांचा तो अख्खा चित्रपट पाठच असेल. आजच्या सोशल मीडियाच्या जगात त्यावरचे मीम्सही अनेकदा व्हायरल होतात.‘आणि या मिसेस बालगंधर्व’ हा या चित्रपटातला डायलॉग ऐकून आणि पाहून तुम्ही अनेकदा खळखळून हसला असाल. तोच या चित्रपटाचा ‘टर्निंग पॉइंट’ आहे. तो प्रसंग पु. ल. देशपांडे यांनी अनुभवलेल्या एका खऱ्या प्रसंगावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी त्याबद्दल सांगितलेली ही आठवण...
................
बालगंधर्व रंगमंदिराशी माझा पहिला संबंध आला, तो १९७२ साली ‘शिकार’ या नाटकात मी काम करत असताना. पुण्यातलं प्रशस्त, आलिशान आणि ग्लॅमरस असं नाट्यगृह, अशी तेव्हा या रंगमंदिराची ख्याती होती. पुण्यात तेव्हा रहदारी फारशी नव्हती आणि या नाट्यगृहाचा परिसरही भरपूर होता. त्यामुळे तिथे खेळायला, बागडायलाही मिळायचं. त्या काळातल्या इतर नाट्यगृहांच्या तुलनेत इथे भरपूर सोयीसुविधा होत्या. त्यामुळे नाटकाचे प्रयोग करताना हुरूप यायचा आणि प्रयोग रंगायचा. मी तेव्हा जेमतेम चौदा वर्षांचा असेन. त्यामुळे कलाकार म्हणून माझ्यासाठी या गोष्टी उत्साह वाढवणाऱ्या होत्या. त्या वेळी नाट्यगृहाच्याच आवारातल्या वसतिगृहात प्रयोगाच्या वेळी मी राहतही असे. ‘शिकार’नंतर मी नाटक करू शकलो नाही, त्यामुळे या नाट्यगृहाशी नियमित संबंध आला नाही. परंतु १९८५नंतर मी म्युझिकल शोज सुरू केल्यानंतर पुन्हा या ठिकाणच्या भेटी वाढल्या. या नाट्यगृहातले माझे शोजसुद्धा चांगलेच रंगले.



त्यानंतर पुन्हा ‘बालगंधर्व’शी संबंध आला, तो तेवढ्याच महत्त्वाच्या आणि अविस्मरणीय अशा गोष्टीसाठी. ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाची कथा माझ्या डोक्यात आली होती आणि ती मी व्ही. शांतारामबापूंना ऐकवली, तेव्हा चित्रपटातला टर्निंग पॉइंट असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा प्रसंग मी त्यांना आवर्जून ऐकवला होता. घराची गरज म्हणून दोन पुरुष बाईचं रूप घेताना दाखवायचं असलं, तरी या कलाकृतीला बालगंधर्वांच्या वेषांतरासारखा उच्च दर्जा असावा, असा माझा आग्रह होता. या चित्रपटात अशोक सराफ बालगंधर्व रंगमंदिरात जातो आणि तिथे बालगंधर्व आणि त्यांचं स्त्रीरूप यांची शेजारी शेजारी असलेली चित्रं बघून त्याला आपल्या मित्रांना बाई बनविण्याची कल्पना सुचते, असा तो प्रसंग होता. वसंतराव सबनीसांशी पटकथा लिहिण्याच्या आधी चर्चा झाली, तेव्हाही लक्ष्याचं डोहाळजेवण आणि हा बालगंधर्व रंगमंदिरातला प्रसंग, या दोन दृश्यांच्या बाबतीत मी माझा आग्रह स्पष्ट केला होता. त्यांनीही त्याला अनुसरूनच पटकथा लिहिली.



पु. ल. देशपांडेंचा माझ्यावर जीव होता. मी त्यांना अनेकदा भेटायचो आणि ते गप्पांमध्ये अनेक किस्से ऐकवायचे. एकदा त्यांनीच किस्सा सांगितला, की ते त्यांच्या काही पाहुण्यांना नव्यानेच बांधलेलं बालगंधर्व रंगमंदिर दाखवायला घेऊन गेले होते. तिथल्या कर्मचाऱ्याला ‘पुलं’ कोण हे माहीत नव्हतं आणि बालगंधर्व कोण, हे तर माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यानं ‘पुलं’ना आणि पाहुण्यांना उत्साहाने नाट्यगृह आतून दाखवलं आणि ते सगळे बालगंधर्वांच्या चित्रांपाशी आले. ‘पुलं’ना डावीकडचा मूळ वेशातला बालगंधर्वांचा फोटो दाखवून तो म्हणाला, ‘हे बालगंधर्व.’ मग शेजारच्या बाईच्या वेशातल्या बालगंधर्वांकडे बघून म्हणाला, ‘आणि या मिसेस बालगंधर्व.’

‘पुलं’चा हा किस्सा माझ्या डोक्यात होता. ‘बनवाबनवी’मध्ये मी तो सुशांत रे याच्या तोंडी माझ्या पद्धतीने वापरला. आपल्या आयुष्यात घडलेल्या, पाहिलेल्या गोष्टी नंतर चांगल्या प्रकारे उपयोगी येतात, त्या अशा. बालगंधर्व रंगमंदिर माझ्यासाठी अशा तऱ्हेनं या चित्रपटासाठी मोलाचं ठरलं. हा चित्रपट प्रदर्शित झाला, ते वर्ष बालगंधर्वांच्या जन्मशताब्दीचं होतं, हा आणखी एक अनोखा योगायोग. ‘अशी ही बनवाबनवी’ला जो दर्जा मिळाला, तो बालगंधर्व रंगमंदिर आणि तिथे असलेल्या बालगंधर्वांच्या त्या दोन चित्रांमुळेच, असं मला वाटतं.

(शब्दांकन : अभिजित पेंढारकर)

(चित्रपटातील तो प्रसंग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LWVUCQ
Similar Posts
‘आनंदपुरुषोत्तमाचे टपाल तिकीट’ व्हरायटी स्टोअर्सच्या त्या काचेमागील ते तिकिटांचे अल्बम तेव्हा माझ्या नशिबात नव्हते; पण मराठी सारस्वताचा मुकुटमणी असलेल्या, मला वेगवेगळ्या संगीत मैफलींना आमंत्रण देऊन संपन्न करणाऱ्या, माझ्या सुरुवातीच्या काळात माझं मनोमन कौतुक केलेल्या, ‘एनसीपीए’च्या संगीत विभागासाठी माझी प्रकाशचित्रं विकत घेणाऱ्या त्या
स्वप्नं आणि स्वप्नं स्वप्नं... खूप खूप स्वप्नं.... एकामागून एक काही शुभ्र, काही काळी, तपकिरी.. निळी, हळवीसुद्धा...एकामागून एक येतात... मन डोलत राहतं... स्वप्नं पडत राहतात. त्याच्या पाठीवर पाय ठेवून सत्याचा जन्म होतो. मनाला बरं वाटतं...पायाखाली खरखरीत स्थैर्य येतं....पण
गृहिणी-सखी-सचिव (उत्तरार्ध) परत ते फोटो पाहताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी आश्चर्याने दंग झालो आणि सुनीताबाईंपुढे नतमस्तकही! मी त्यांचे ‘सोयरे-सकळ’च्या प्रकाशनात १९९८ साली फोटो टिपले होते. बरोबर दहा वर्षांनी पुरस्काराच्या वेळी त्यांनी परत तीच जांभळी फुले असलेली साडी नेसली होती. माणसाचा साधेपणा, व्यवस्थितपणा, किती असावा, त्याच्या
हाडाच्या कार्यकर्त्या, संवेदनशील लेखिका – दीपा देशमुख प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांचा २८ ऑक्टोबर हा जन्मदिन. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाच्या औचित्याने दीपाताईंची जिवाभावाची मैत्रीण डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ यांनी लिहिलेला, दीपाताईंची वाटचाल उलगडणारा लेख त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. कार्यक्रमाचा व्हिडिओही शेवटी दिला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language